कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन (lockdown) करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमुळं मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (mumbai local) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मिशन बिगिन अगेन अंतर्गत लोकल सेवा सुरू करण्यात आली. परंतु, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्यात आली. अशातच आता मागील ७ महिन्यांपासून बंद असलेली वातानुकूलित लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे (western railway) प्रशासनानं १५ ऑक्टोबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत एसी लोकल आणण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकलच्या दिवसभरात १० फेऱ्या होणार असल्याची माहिती मिळते. १५ ऑक्टोबरपासून एकूण १९४ लोकल (local) फेऱ्यांची भर पडणार आहे. यामध्ये सामान्य लोकलसह वातानुकूलित लोकल (ac local) फेऱ्यांचा समावेश आहे. वातानुकूलित लोकलच्या महालक्ष्मी ते बोरीवली आणि बोरीवली ते चर्चगेट अशा २ फेऱ्या धिम्या मार्गावर होणार आहेत. तर चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट अशा अप-डाऊन मार्गावर मिळून ८ जलद लोकल फेऱ्या होणार आहेत.
लॉकडाऊनपूर्वी वातानुकूलित लोकलच्या दिवसभरात १२ फेऱ्या होत होत्या. सध्या मेल-एक्स्प्रेस धावत असून त्यातही वातानुकूलित डबे आहेत. यातूनही प्रवासी प्रवास करत असून यामधील वातानुकूलित यंत्रणेचे तापमान नियंत्रणात असते. त्याचप्रमाणे वातानुकूलित लोकलमधील तापमान नियंत्रणात ठेवलं जाणार आहे. ही लोकल सॅनिटायजही केली जाणार आहे. प्रवासीही मास्क घालून खबरदारी घेऊन प्रवास करतील असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी स्पष्ट केलं.
१९४ लोकल फेऱ्यांमध्ये ५१ फेऱ्या चर्चगेट ते विरार दरम्यान, बोरीवली ते चर्चगेट दरम्यान ९६, भाईंदर ते विरार दरम्यान ९ फेऱ्या, नालासोपारा ते चर्चगेट दरम्यान १२ फेऱ्या, चर्चगेट ते भाईंदर दरम्यान ९, वसई रोड ते चर्चगेट दरम्यान २ फेऱ्या, वांद्रे ते बोरीवली दरम्यान ८ आणि चर्चगेट ते वांद्रे दरम्यान ८ फेऱ्या होणार असल्याची माहिती मिळते.
सध्यस्थितीत पश्चिम रेल्वेवर ५०६ लोकल फेऱ्या होत होत्या. नवीन फेऱ्यांची भर पडणार असल्याचे एकूण फेऱ्यांची संख्या ७०० होणार आहे. लोकल फेऱ्यांची कमी संख्या, वाढत जाणारे प्रवासी आणि होणारी गर्दी पाहता उच्च न्यायालयानं फेऱ्यांची संख्या प्रत्येकी ७००पर्यंत वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पश्चिम रेल्वेने नवीन फेऱ्यांची भर पाडताना मध्य रेल्वेनंही (central railway) लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरदिवशी ४५३ फेऱ्या मध्य रेल्वेवर होतात. या फेऱ्या आणखी ७०० पर्यंत वाढवण्यात येतील आणि लवकरच त्याची माहिती दिली जाणार असल्याची माहिती मिळते. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाडीची प्रवासी क्षमता ५ हजार ९६४ आहे. १ हजार २८ प्रवासी आसनक्षमता आणि उभ्यानं ४ हजार ९३६ प्रवासी प्रवास करू शकतात. लॉकडाऊनपूर्वी दररोज होणाऱ्या १२ फेऱ्यांमधून सरासरी १८ हजार प्रवासी प्रवास करत होते.
हेही वाचा -
NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान
MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली