रेल्वे स्थानकांवरील वाढत्या गर्दीमुळे लोकल पकडताना प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या एकूण ३२ रेल्वे स्थानकांवर २८१५ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वे स्थानकांवरील एकात्मिक सुरक्षा यंत्रणेसाठी २० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या एकात्मिक सुरक्षा यंत्रणा योजनेंतर्गत ऑगस्ट २०१९ पर्यंत पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. या सीसीटीव्हीच्या आधारे स्थानकावरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास रेल्वे सुरक्षा बलाचे जवान पाठवण्यास मदत होणार आहे.
रेल्वे तिकीट खिडकी, पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट या ठिकाणी देखील सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. स्थानकावर प्रवाशांचे मोबाइल चोरीला गेल्यास चोराला पकडणे अशक्य होत. त्यामुळे या सीसीटीव्हीमध्ये चेहरा ओळखण्याची विशिष्ट यंत्रणा देखील बसविण्यात येणार असून मोबाइल चोरांसह अन्य गुन्हेगारांना पकडणे सहज शक्य होणार आहे.
हेही वाचा -
परळ स्थानकानंतर जोगेश्वरी स्थानकात उभारणार टर्मिनस
स्वराली जाधवच्या सूरांना लाभला राजगायिकेचा मान!