अभिनेता आयुषमान खुराना 'बाला' चित्रपटानंतर आणखी वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम करणार आहे. 'शुभ मंगल सावधान' चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे. या चित्रपटात आयुषमान एक वेगळी भूमिका साकारताना दिसेल. चित्रपटात आयुषमान 'गे' ची भूमिका साकारताना दिसणार आहे.
आर. एस. प्रसन्न दिग्दर्शित 'शुभ मंगल सावधान' २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. यात आयुषमानला सेक्सशी संबंधीत एक आजार असतो. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस तर उतरलाच. शिवाय बॉक्स ऑफिसवर पण चित्रपटानं चांगली कमाई केली.
'शुभ मंगल सावधान'च्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर निर्माता आनंद एल राय 'शुभ मंगल सावधान २' या चित्रपटाच्या कामाला लागले आहेत. चित्रपटात आयुषमानच्या विरुद्ध भूमी पेडणेकर दिसणार नाही. त्या जागी कुठलीच अभिनेत्री झळकणार नाही. तर आयुषमान खुरानासोबत दिव्येंदु शर्मा झळकणार आहेत. दिव्येंदु चित्रपटात आयुषमानच्या लव्हरची भूमिका साकारत आहेत. चित्रपट समलैंगिक प्रेमसंबंधांवर आधारित आहे.
यापूर्वी दिव्येंदु शर्मानं 'प्यार का पंचनामा', 'टॉयलेट एक प्रेम कथा' आणि 'बत्ती गुल मीटर चालू' अशा काही चित्रपटात काम केलं आहे. पण 'मिर्जापूर' वेब सिरीजमध्ये साकारलेल्या नकारात्मक भूमिकेनंतर त्याला खरी ओळख मिळाली. तर दुसरीकडे आयुषमान 'अंधाधुंद', 'बधाई हो' सारखे हिट चित्रपट देत आहे. येत्या काळात आयुषमान अनुभव सिन्हा यांच्या 'आर्टिकल १५', दिनेश विजन यांच्या 'बाला' आणि एकता कपूरच्या 'ड्रीम गर्ल' या चित्रपटात झळकणार आहे.
हेही वाचा