मध्य आणि पूर्व उपनगरी भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (brihanmumbai municipal corporation) एक नवीन जल बोगदा बांधणार आहे. या प्रकल्पात धारावी (dharavi) आणि घाटकोपर (ghatkopar) दरम्यान 8.48 किलोमीटर लांबीच्या जल बोगद्याच्या बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्पाचे कंत्राट बीएमसीने वेलस्पन एंटरप्रायझेसला दिले आहे.
1,989 कोटी रुपये खर्चून हा बोगदा (water tunnel) बांधला जाणार असून हा बोगदा 93 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. घाटकोपर येथे 145 ते 150 मीटर भूगर्भात बोगदा बांधण्यात येणार असून त्याची खोली जास्तीत जास्त 152 मीटर असेल. भविष्यात नुकसान टाळण्यासाठी ही खोली आवश्यक आहे.
हे बांधकाम पूर्ण झाल्यावर बोगद्याचा व्यास 2.7 मीटर असेल. प्रकल्प बांधकामासाठी टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) वापरणार आहे. हा बोगदा शहरातील पाण्याच्या बोगद्यांच्या मोठ्या नेटवर्कचा एक भाग आहे. घाटकोपर ते भांडुपपर्यंत महापालिका बांधत असलेल्या 11.61 किलोमीटर लांबीच्या बोगद्याला तो जोडला जाईल.
हा बोगदा तयार झाल्यानंतर मुंबईत एकूण 100 किलोमीटरचे जलबोगदे असतील. गळती कमी करून पाणी दूषित होण्यापासून रोखणे आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. तसेच खोल बोगद्यांमुळे भविष्यातील बांधकाम प्रकल्पांमध्ये होणारे नुकसानही कमी होईल.
ऑगस्टमध्ये, महापालिकेने (bmc) घाटकोपर आणि वडाळा दरम्यानचा 9.7 किलोमीटरचा जलबोगदा बांधून पूर्ण केला होता. यामुळे मुंबईतील भूमिगत पाण्याच्या बोगद्याचे जाळे 100 किलोमीटरपर्यंत वाढले. न्यूयॉर्कमध्ये जगातील सर्वात लांब पाण्याचा बोगदा 111 किलोमीटर आहे.