मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सकळ भागात पाणी साचल्याच पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
काही सखल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.
आज दिवसभर देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या (सकाळच्या )सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाच्या परीक्षेचा आढावा घेऊन दुसऱ्या सत्रातील म्हणजे दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं मुंबई महानगरपालिका प्रशासनकडून सांगण्यात येत आहे. तसेच नोकरदारांना देखील घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ या भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच उपनगरात असल्फा, साकीनाका, जेबी नगर, विक्रोळी, घाटकोपर, चकाला, अंधेरी या परिसरातही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या साचलेल्या पाण्यातून गाड्यांना मार्ग काढता येत आहे. मात्र, वाहतुकीचा वेग मंदावल्याने रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होण्यास सुरुवात झाली आहे.