पालिकेच्या एफ-दक्षिण विभागात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी वैद्यकीय दुकाने वगळता अत्यावश्यक सेवा बुधवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. एफ-दक्षिण विभागात लालबाग, परळ, नायगाव, काळाचौकी, वडाळा आणि शिवडी यांचा समावेश आहे. या विभागात कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाल्यानं ३ दिवस बंदची घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिलेल्या महितीनुसार, मागील 8-10 दिवसात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काटेकोरपणे पाळण्याचा निर्णय घेतला आहे. शिवडीत पूर्ण बंद ठेवल्यानंतर गेल्या ४ दिवसांत नवीन रुग्ण आढळले नाहीत.
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) कडे वैद्यकीय दुकाने वगळता अत्यावश्यक दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली होती. दूकान बंद ठेवल्यास कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असं नगरसेविका उर्मिला पांचाळ यांनी म्हटलं.
२२ एप्रिल रोजी पालिकेच्या एफ-दक्षिण प्रभागात १३८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, सोमवार, ४ मेपर्यंत ही संख्या २९९ वर पोचली आहे.
दरम्यान, सोमवारी पोलिसांनी काढलेल्या आदेशात मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, सोमवारी मध्यरात्रीपासून हा आदेश लागु करण्यात आला.