मुंबईत मंगळवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्रच हाहाकार माजला होता. या पावसामुळे मुंबईत विविध ठिकाणी अनेक जण वाहून गेले. या अतिवृष्टीमुळे दहिसरमध्ये दोन जण नाल्यात वाहून गेले. यामध्ये एका तरुणाचा शोध लागला असून आणखी एका तरुणाचा शोध पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत.
मंगळवारी मुंबई पूर्णपणे तुंबली होती. त्यावेळी दहिसर पूर्व येथील रावलपाडा परिसरात राहणारे प्रतिक घाटले आणि गौरव राजू हे दोघे मित्र नाल्यावरील पूल ओलांडत असतानाच हा पूल तुटला. त्यावेळी नाल्यात वाहू लागल्यानंतर दोघांनी आरडाओरड केली. त्यानंतर स्थानिकांनी धाव घेत गौरवला बाहेर काढले आणि त्याला कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. पण प्रतिक अजूनही बेपत्ता आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्याचा शोध सुरू आहे.
हे दोघेही तरुण गणपती विसर्जनासाठी ढोल ताशा पथकासाठी तयारी करत होते. ते दहिसरच्या कोकणीपाडा परिसरात राहणारे आहेत.
हेही वाचा -
धुंवाधार पावसामुळे ५ जणांचा बळी, चौघे अजूनही बेपत्ता
वरळीतील मॅनहोलमध्ये सापडला डॉ. अमरापूरकर यांचा मृतदेह