मुंबईतील नागरिकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचे पैसे हे जलमापकांवर आधारीत आकारले जातात. परंतु अनेक भागांमध्ये पाण्यातील कचऱ्यामुळे जलमापके बंद पडत असून त्यामुळे अंदाजित पाण्याची बिले पाठवली जात आहेत. अनेक ग्राहकांना तिप्पट पाणी पट्टीचे पैसे आकारले जात असल्याने महापालिका सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त होत असून यासाठी महापालिकेने मंजूर केलेल्या ठरावात सुधारणा करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक किरण लांडगे यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे पाण्याच्या बिलाच्या नावावर नागरिकांच्या होणाऱ्या लुटीबाबत आवाज उठवला. जलवाहिनीतून येणाऱ्या पाण्याचा किती वापर केला? हे जाणून घेण्यासाठी बसवण्यात येणारी जलमापके ही पाण्यातील वाहून येणाऱ्या कचरा तसेच दगडांमुळे खराब होतात. त्यामुळे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ मीटर बंद पडल्यास त्यामुळे आपण जेवढे दररोज पाणी वापरतो, त्यावर २५ टक्के अधिक अंदाजित बिल पाठवणे आवश्यक आहे.
प्रत्यक्षात मात्र जलमापकांवरील पाण्याची नोंद किंवा वापरले जाणारे पाणी यापेक्षा अधिक जे असेल तेच ग्राह्य धरून अंदाजित बिल पाठवले जाते. त्यामुळे तीन महिन्यांचे बिल जिथे २० हजार यायचे तिथे आज नागरिकांना ९० हजारांपर्यंत येत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सरासरी रकमेवर २५ टक्के अधिक बिल आकारण्याच्या जुन्या पद्धतीचा पुन्हा अवलंब करण्यासाठी स्थायी समितीने केलेल्या ठरावात बदल करण्याची मागणी किरण लांडगे यांनी केली.
लांडगेंच्या या मागणीला शिवसेनेचे सगुण नाईक यांनी पाठिंबा देत हा विषय केवळ एका विभागापुरता नसून सर्व २२७ प्रभागांमध्ये हीच परिस्थिती असल्याचे सांगितले. परंतु, केवळ अंदाजित बिले पाठवली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. महापालिका ही सेवा देणारी संस्था आहे. पण आता ती मेवा खाणारी संस्था झाली आहे, असा लोकांचा समज झाल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा प्रकार गंभीर असल्याचं सांगितलं. जर मीटर बंद पडला असेल, तर मिटर रीडिंग घ्यायला येणाऱ्यांनी याची कल्पना संबंधितांना द्यायला हवी. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
हेही वाचा
थंड पदार्थ खा जपून! मुंबईतला ९८ टक्के बर्फ दूषित