रमजानचा महिना सुरू असल्याने मुंबईतील बऱ्याच ठिकणी खाण्याचे स्टॉल लावले जात आहेत. मात्र मुंबईतील खवय्यांचे पाय बी विभागातील मोहम्मद अली रोड, डोंगरी भागातील खाऊगल्लीकडे वळतात. मात्र, यंदा या परिसरातील स्टॉलवर पालिकेने मर्यादा ठेवली आहे. पालिकेने या स्टॉलला पिवळ्या रंगाची लाईन आखून दिली आहे. या पिवळ्या लाईनच्या बाहेर जर स्टॉल आले, तर त्या स्टॉल धारकावर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. त्यामुळेच यंदा हा रस्ता मोकळा आणि वाहतुकीसाठी सोयीचा ठरला आहे.
विशेष म्हणजे बी वॉर्डच्या एएलएम म्हणजेच अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटचा यात खारीचा वाटा आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व स्थानिकांना एकत्र घेऊन एएलएमने विभागाचा आढावा घेत त्याबाबत पालिकेला माहिती दिली आणि त्यावर तोडगा काढला. यासाठी 'सबका साथ' आणि 'हेल्प एएलएम'च्या लोकांनी मेहनत देखील घेतली. कुठलीही आपात्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच या दिवसांत इथे ट्रॅफिकची समस्या होऊ नये, म्हणून पालिकेकडून पिवळी लाईन आखून स्टॉल्सना परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, काहीजण या पिवळ्या लाईनजवळ पार्किंग करत असल्याने आम्हालाही थोडा का होईना, पण त्रास होतो असे खजूर विक्रेते आसिफ अन्सारी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.