भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सोमवारी केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. गांगुलीच्या नावाची औपचारिक घोषणा होणं फक्त बाकी आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शाह हे बीसीसीआयचे सचिव म्हणून तर, अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुणसिंह ठाकूर हे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या नावावरून २ गट पडले होते. माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर व एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी आपापली नावं पुढं केली होती. या दोन्ही नावावरून अनेक चर्चा झाली. अखेर गांगुलीच्या नावावर सर्वसहमती झाली.
६५ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराला बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला आहे. बीसीसीआयचे पूर्णवेळ अध्यक्षपद भूषवणारा गांगुली हा दुसरा कर्णधार ठरला आहे. अध्यक्षपद मिळाल्याचा आनंंद व्यक्त करताना गांगुली म्हणाला की, ही नवीन जबाबदारी स्विकारताना आनंद होत आहे. बीसीसीआयची सध्याची प्रतिमा चांगली नाही. त्यामुळे ही प्रतिमा सुधारण्याचं पहिलं काम मी करणार आहे. ४७ वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे.