अंधेरीतील एका नामांकित शाळेतील ३ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या फ्रेंच ट्रस्टीचा जामिन अखेर उच्च न्यायालयानं रद्द केला आहे. जामिन रद्द झाल्यानं या फ्रेंच ट्रस्टीला शरण येण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं दिले आहेत.
२०१७ मध्ये तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता. पालकांना संशय आल्यानंतर पालकांनी खोलात जाऊन चौकशी केली असता बलात्कारची घटना उघड झाली. त्यानंतर या फ्रेंच ट्रस्टीनं बलात्कार केल्याचंही समोर आलं. त्यानुसार त्याला अटक झाली. पण ट्रस्टीला जामिन मंजूर झाला आणि त्यानंतर हा ट्रस्टी पुन्हा शाळेत येऊ लागला.
या ट्रस्टीला जामिन मिळाल्यानं आणि तो पुन्हा शाळेत येऊ लागल्यानं पोक्सो (बाल लैंगिक अत्याचार २०१२) अंतर्गत पालकांनी न्यायालयात धाव घेत ट्रस्टीचा जामिन रद्द करण्याची मागणी केली. या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू असून गेल्या आठवड्यात न्यायालयानं या प्रकरणी पोलिसांची चांगलीच कान उघडणी केली.
पोक्सो प्रकरणातील पीडित मुलांना-पालकांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलवता येत नसल्याने त्यांना पोलिस ठाण्यात कसं आणि का बोलावता? असा सवाल करत न्यायालयानं गेल्या आठवड्यात एमआयडीसी पोलिसांचे कान उपटले होते. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त करत पोलिसांच असंच वर्तन राहिलं तर पोक्सो प्रकरणी तक्रार करण्याकरता पालक पुढे येणार नसल्याबद्दलची चिंताही व्यक्त केली होती.
सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली असून न्यायालयानं अखेर त्या ट्रस्टीचा जामिन रद्द करत याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा दिला.
हेही वाचा-
पीडित मुलांना पोलिस ठाण्यात बोलावतातच कसं? पोक्सोप्रकरणी न्यायालयानं पोलिसांना झापलं