वडाळा - वर्षानुवर्षे बंद खोल्यांमध्ये घुसखोरी करून राहत असलेल्या वडाळा पूर्व म्हाडा कॉलनी येथील शुभम को ऑप. हौसिंग सोसायटी संक्रमण शिबिरातील खोली क्रमांक 704 ला सील करुन शुक्रवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कक्षाच्या वतीने टाळे ठोकण्यात आले आहे. त्याचबरोबर संक्रमण शिबिरातील 606, 607, 608 या क्रमांकांच्या खोल्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्या खोल्यांवर टप्याटप्याने कारवाई करण्यात येणार आहे, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
एमएमआरडीएच्या वतीने 9 मार्च 2017 ला खोली क्रमांक 704 ला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती आणि खोली रिकामी करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र घुसखोराने घर रिकामे करण्याऐवजी घराला टाळे ठोकून घटनास्थळावरून काढता पाय घेतला. त्यानंतर वडाळा टीटी पोलीसांनी एमएमआरडीए सहनियंत्रक मधुकर सवतकर यांच्या उपस्थितीत या घराला लावण्यात आलेल्या टाळ्यावर दुसरे टाळे ठोकून या खोलीला सील केले. तसंच शुभम को ऑप. हौसिंग सोसायटी संक्रमण शिबिरात अजूनही काही घुसखोर कुटुंब रहात असून त्या सर्व कुटुंबावर टप्प्याटप्प्याने कारवाई होणार असल्याचे सवतकर यांनी सांगितले. ही कारवाई उपमहानगर उपायुक्त अनिल वानखेडे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. या वेळी निष्कासित अधिकारी वसंत साळुंके उपस्थित होते. दरम्यान संक्रमण शिबिरातील कारवाई पाहून अनेक स्थानिक दलालांनी घटनास्थळावरून पळ काढला.
साधारण, 20 वर्षांपूर्वी वडाळ्यातील म्हाडा कॉलनी येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे संक्रमण शिबिर बांधण्यात आले होते. दरम्यान इमारतीमधील अनेक खोल्या बऱ्याच दिवसांपासून रिकाम्या पडून होत्या. परिणामी या बंद खोल्यांवर स्थानिक दलालांची नजर पडली आणि त्यांनी पैशाच्या हव्यासापोटी संक्रमण शिबिरातील बंद खोल्यांचे कुलूप तोडून खोल्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. तत्पूर्वी सदर संक्रमण शिबिरावर अनेकदा कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे या घुसखोरांवर सक्तीची कारवाई होणे गरजेचे आहे, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.