मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीपेक्षा हिंदीतच चांगली रुळलीय. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या ‘राजी’ या सिनेमात अमृताने साकारलेल्या मुनिराचं सर्वांनीच कौतुक केलं आहे. ‘राजी’च्या रूपात १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये समाविष्ट होणारा सिनेमा खात्यावर जमा झाल्यानंतर अमृता आता वेबसीरिजचा अनुभव घेण्यासाठी सज्ज झाली आहे.
मोठमोठ्या कलाकारांना आज वेबसीरिजनं पछाडलं असताना अमृता कशी बरं मागे राहिल? अमृताची पावलंही आता वेबसीरिजच्या दिशेनं वळली आहेत. ‘राजी’मध्ये अमृताने एका सोज्वळ पाकिस्तानी स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली होती.
परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेबसीरिजमध्ये अमृताचं आजवर कधीही न पाहिलेलं रूप पाहायला मिळेल. या वेबसीरिजची कथाच अमृताने साकारलेल्या व्यक्तिरेखेभोवती गुंफण्यात आली आहे. यात ती बोल्ड आणि काहीशा हिंसक रूपात दिसणार असल्याचं समजतं.
आजवरच्या करियरमध्ये अमृताने नेहमीच विविधांगी भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. ‘राजी’ने अमृताच्या करियरला कलाटणी दिली असताना तिने थेट खलनायिका साकारण्याचं आव्हान स्वीकारलं आहे.
सध्या तरी या वेबसिरीजबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात येत असली तरी यात अमृता बऱ्याच मानवी हत्या करणाऱ्या गुन्हेगाराच्या भूमिकेत दिसणार आहे. खलनायिकेची भूमिका साकारण्याचा हा अनुभवही आपल्या करियरच्या ग्राफमध्ये आमूलाग्र बदल घडवणारा ठरेल, असा अमृताला विश्वास वाटतो.
हेही वाचा-
होय, बाॅलिवूडमध्ये होतं कास्टिंग काऊच- आलिया भट