राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, मात्र ओमायक्रॉन विषाणूच्या केपी.2 या उपप्रकाराच्या 91 रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. पुणे येथे 51, तर ठाणे येथे दोघांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यामध्ये या उपप्रकाराचा रुग्ण महाराष्ट्रात आढळून आला होता. संसर्गक्षमता असली, तरीही या प्रादुर्भावामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हा उपप्रकाराचा मुंबईत एकही रुग्ण नाही.
मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये नोंद झालेल्या करोना रुग्णांमध्ये या उपप्रकारामुळे संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. राज्याच्या जिनोम निर्धारण समन्वय समितीचे समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी जेएन.1 पासून या उपप्रकाराची उत्पत्ती झाल्याचे सांगितले. मार्च महिन्यामध्ये राज्यात रुग्णसंख्येत किंचित वाढ दिसून आली होती. या महिन्यात 250 करोना रुग्णांची नोंद झाली आहे.
पुणे आणि ठाणे वगळता अमरावती आणि औरंगाबाद येथे या उपप्रकाराच्या सात रुग्णांची नोंद झाली आहे. सोलापूर येथे दोन, तर अहमदनगर, नाशिक, लातूर आणि सांगली येथे प्रत्येकी एका रुग्णसंख्येची नोंद झाली. मुंबईमध्ये मात्र या उपप्रकाराच एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही.
हेही वाचा