अभिनेता हेमंत ढोमे अभिनयाकडून दिग्दर्शनाकडं वळला असून, ‘बघतोस काय मुजरा कर’ या सिनेमानंतर त्यानं दिग्दर्शित केलेला ‘सातारचा सलमान’ हा मराठी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमातील 'आय वॉन्ट टर्मरिक ॲान एव्हरीबाॅडी’ हे गाणं हेमंतवर चित्रीत करण्यात आलं आहे.
हेमंत दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'सातारचा सलमान' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. लग्नाच्या आधी होणाऱ्या हळदीच्या समारंभातील हे गाणं धमाल पार्टी साँग आहे. या गाण्यानं चित्रपटाची सुरुवात होत असल्यानं हे हळदीचं गाणं धमाकेदार असावं, अशी हेमंतची इच्छा होती. या इच्छेला योग्य न्याय देत गीतकार क्षितिज पटवर्धन आणि संगीतकार अमितराज यांनी जोरदार गाणं तयार केलं, तर नागेश मोर्वेकर यांनी हे गाणं स्वरबद्ध करत त्यावर स्वरसाज चढवला आहे.
नेहा महाजन, अनिकेत विश्वासराव आणि हेमंत ढोमे यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं प्रत्येकालाच थिरकायला लावणारं आहे. या गाण्याबद्दल हेमंत म्हणाला की, म्युझिक सिटींगसाठी आमची टिम एकत्र बसली होती. गाण्याबद्दल विचार सुरू असताना क्षितिजला 'आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी' असं हटके आणि सहज ओठांवर रुळणारे शब्द सुचले आणि याच शब्दांचा आधार घेत हे हळदीचं गाणं तयार झालं. मी या गाण्यातल्या मुख्य भूमिकेसाठी कलाकाराच्या शोधात होतो. शेवटपर्यंत मला पाहिजे तशी व्यक्ती मिळाली नाही. मग ही भूमिका मीच करावी, असं सर्वानुमते ठरलं. हे गाणं ऐकताना नक्कीच सगळ्यांना ठेका धरायला लावेल यात शंका नाही.
https://www.youtube.com/