नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात देशामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या आमदारांमध्ये मुंबईतील भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत. लोढा यांचं वार्षिक उत्पन्न ३४ कोटी ६६ लाख ८२ हजार ६१० रुपये आहे. तर काँग्रेसचे कर्नाटकमधील आमदार एन. नागाराजू या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांचं वार्षिक उत्पन्न १ अब्ज ५७ कोटी ०४ लाख २९ हजार २१० रुपये इतकी आहे.
हे सर्वेक्षण 'असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म' (एडीआर) ने केलं आहे. 'एडीआर'ने केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील एकूण ३ हजार १४५ आमदारांच्या वार्षिक कमाईची आकडेवारी सादर करून टाॅप २० आमदारांची निवड केली आहे. या टाॅप २० यादीत महाराष्ट्रातील आमदारांचाही समावेश आहे.
यापैकी भाजपाचे मुंबईतील आमदार मंगलप्रभात लोढा दुसऱ्या क्रमांकावर, तर सोलापूरमधील भाजपाचे आमदार दिलीप सोपल (वार्षिक उत्पन्न- ९ कोटी ८५ लाख रुपये) सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी आपल्या उत्पन्नाचं साधन वकिली आणि शेती व्यवसाय असं नमूद केलं आहे. यादीत शेवटच्या म्हणजेच २० व्या क्रमांकावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. त्यांचं वार्षिक उत्पन्न ४ कोटी ५६ लाख रुपये आहे.
'एडीआर'ने सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या आमदारांचीही वेगळी यादी बनवली आहे. या यादीत शेवटच्या २० व्या क्रमांकावर राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव आहे. त्यांचं वार्षिक उत्पन्न ९ लाख ९ हजार ३४८ रुपये आहे.
हेही वाचा-
जातवैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास १ वर्षाची मुदतवाढ
गणेशोत्सव कार्यक्रमात काँग्रेस नेत्यावर उधळल्या नोटा