महाराष्ट्राच्या १८ वर्षांखालील संघानं ज्युनियर नॅशनल रग्बी सेव्हन्स चॅम्पियनशिप जिंकण्याची करामत केली अाहे. अंतिम फेरीत महाराष्ट्रानं बिहारचा २४-० असा धुव्वा उडवत विजेतेपदावर नाव कोरले. महाराष्ट्राचे धार्युष कपाडिया अाणि अार्यन सिंग यांनी ज्युनियर गटात सर्वोत्तम गुण पटकावणाऱ्या पाच जणांच्या यादीत स्थान पटकावले.
तामिळनाडूतील मदुराई येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाण्याअाधी महाराष्ट्राच्या संघाचा मुंबई येथे सराव सुरू होता. महाराष्ट्राने उपांत्य फेरीत अोडिशावर २६-५ असा सहज विजय मिळवला होता. त्यानंतर अंतिम फेरीत अात्मविश्वासाने खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या मुलांनी बिहारचे अाव्हान अारामात परतवून लावले. महाराष्ट्राच्या संघाने बिहारला एकही गुण मिळवू न देता विजेतेपद प्राप्त केले.
महाराष्ट्राच्या मुलींना या स्पर्धेत मात्र चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या मुलींनी पहिल्या सामन्यात गोव्याचा २४-० अाणि दुसऱ्या सामन्यात तेलंगणाचा ३१-० असा पाडाव केल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत तामिळनाडूवर ७-० अशी मात केली होती. उपांत्य फेरीत मात्र महाराष्ट्राला अोडिशाकडून २६-७ अशी हार पत्करावी लागली. तिसऱ्या-चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यातही महाराष्ट्राला बिहारकडून ५-१० असा पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा -
'अन् विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरी फोन गिफ्ट दिला'
मुंबईच्या अाणखी एका प्रशिक्षकाचा राजीनामा